राजगुरुनगर : खेड तालुक्यातील हुतात्मा राजगुरू विद्यालयातील ८० विद्यार्थ्यांना शाळेत दिला जाणारा शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील हुतात्मा विद्यालयात पहिली ते दहावीचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना शाळेतूनच पोषण आहार दिला जातो. दुपारी नेहमीप्रमाणे शाळेत मुलांना पोषण आहार देण्यात आला. मात्र, पोषण आहार खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांना त्रास होण्यास सुरुवात झाली. एक, दोन नाही तर तब्बल ८० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं समोर आलं.
एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्याने शाळा प्रशासनाने तातडीने विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. विद्यार्थ्यांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेची माहिती पालकांना समजताच पालकांनी थेट रुग्णालयात मुलांना पाहण्यासाठी धाव घेतली.
पालक “आमच्या मुलांना आम्हाला बघू द्या”, अशी विनवणी पोलिसांना करत आहेत. रुग्णालयात पालकांनी शाळा प्रशासनाच्या कारभाराबद्दल तीव्र आक्षेप घेतला आहे. “आमच्या विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार हा निकृष्ट दर्जाचा आहे. त्यामुळेच आमच्या मुलांना त्रास झाला”, असल्याचे पालकांकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेनंतर प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पाहणीसाठी दाखल झाले असून नेमका हा विषबाधा कसा झाला? याबाबत चौकशी सुरू केली आहे. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.