पुणे : लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील १३ साखर कारखान्यांना १८९८ कोटींचे कर्ज देण्यात येणार आहे. यातील बहुतांश कारखाने भाजप आणि अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने हमी घेतलेल्या या कारखान्यांमध्ये काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या राजगड कारखान्याचा समावेश आहे. राजगड साखर कारखान्याला ८० कोटी रुपयांची कर्जहमी देण्यात येणार आहे. संग्राम थोपटे हे बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर विधानसभेचे आमदार असून त्यांना खूश करण्यासाठी आणि आपल्याकडे वळवण्यासाठीच अजित पवारांनी ही चाल खेळल्याचे बोलले जात आहे. संग्राम थोपटे हे सध्या सुप्रिया सुळेंसोबत आहेत. तर या ठिकाणाहून सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असतील. यासाठीच ही खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राज्य सरकार स्वत:च्या जबाबदारीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमकडून कर्ज घेऊन ते कारखान्यांना देणार असल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे आचारसंहिता लागू होण्याच्या आधी मंत्रिमंडळ उपसमितीने या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारच्या एका समितीने यासाठी १३ कारखान्यांची निवड केली आहे. त्यामध्ये भाजपचे ५ राष्ट्रवादीचे ७ आणि एक कारखाना काँग्रेसशी संबंधित आमदाराचा आहे. काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना खूश करण्यासाठीच त्यांच्या कारखान्याला कर्जहमी देण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे.
अजित पवार गटाशी संबंधित साखर कारखाने
– लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखाना (बीड)- 104 कोटी
– किसनवीर (सातारा)- 305 कोटी
– किसनवीर (खंडाळा)- 150 कोटी
– लोकनेते मारोतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना(नेवासा) – 150 कोटी
– अगस्ती (अहमदनगर) – 100 कोटी
– अंबाजोगाई (बीड)- 80 कोटी
– शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा)- 110 कोटी
भाजपशी संबंधित साखर कारखाने
– संत दामाजी(मंगळवेढा) – 100 कोटी,
– वृद्धेश्वर (पाथर्डी)- 99 कोटी
– सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे ( कोपरगाव) -125 कोटी
– तात्यासाहेब कोरे वारणानगर (कोल्हापूर) -350 कोटी
– बसवराज पाटील यांचा विठ्ठलसाई (धाराशिव) -100 कोटी
दरम्यान, भोरच्या अनंतराव थोपटे यांच्याशी शरद पवारांचे गेल्या ४० वर्षांपासून राजकीय मतभेद आहेत. मात्र, अजित पवारांनी वेगळी चूल मांडल्यानंतर शरद पवार यांनी राजकीय वैर विसरून भोरच्या अनंतराव थोपटे यांची भेट घेतली आणि सु्प्रिया सुळेंसाठी बारामतीचे गणित जुळवून आणल्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान अजित पवार गटाने त्यांना आपल्यासोबत घेण्यासाठी राजगड कारखान्याला ८० कोटींची कर्जहमी हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे.