पुणे : भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची सोमवारी (दि. ०९) अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेने पुण्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस आणि पुणे गुन्हे शाखेच्या पथकाने ८ ते १० संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे.
चौकशीदरम्यान, या संशयितांमधील दोघांकडून पोलिसांना महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. या माहितीच्या आधारे गुन्ह्याची उकल होऊ शकते, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. वाघ यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा पवन शर्मा असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणातील इतरही फरार आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली आहे, संबंधित आरोपींना लवकरच अटक केली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात येतं आहे.
या प्रकरणात नवनाथ गुरसाळे याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. गुरसाळे हा ड्रायव्हर म्हणून काम करतो, तर शर्मा हा एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. आरोपींची सतीश वाघ यांच्यासोबत वैयक्तिक दुश्मनी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आता ही दुश्मनी कशामुळे झाली आणि हत्येचं कारण काय असू शकतं, याचा तपास पोलीस करत आहेत.