पुणे : पुणे शहरात रविवारी (दि. २८ जुलै) झिकाचे आणखी ८ रुग्ण आढळले असून, त्यामध्ये दहा वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे. आता झिका रुग्णांची संख्या आता ४५ वर पोहोचली आहे. झिकाबाधित असलेल्या दोन ज्येष्ठ नागरिकांचा संशयित मृत्यू झाला आहे. परंतु, झिकाबरोबरच त्यांना इतरही आजार असल्याचे समोर आले आहे. यामध्ये हृदय आणि यकृताचा आजार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झिकामुळे झाला की, अन्य आजारामुळे झाला याची तपासणी पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेला पत्र लिहिले आहे. मृत्यू झालेले ज्येष्ठ नागरिकाचे वय ७१ पेक्षा जास्त होते. त्यापैकी एक सह्याद्री हॉस्पिटल आणि दुसरा रुग्ण हा जोशी हॉस्पिटलमध्ये दाखल होते. त्याचा १४ जुलै रोजी मृत्यू झाला होता. जोशी रुग्णालयातील रुग्ण वारजे येथील असून, १४ जुलै रोजी उच्च रक्तदाबासह आरोग्यासंबंधीच्या आजारांमुळे त्यांना मृत घोषित करण्यात आले होते, तर १९ जुलै रोजी त्यांच्या नमुन्यांमध्ये झिका संसर्गाचे निदान झाले होते. तर दुसरा रुग्ण खराडी येथील असून त्याला सह्याद्रीमध्ये दाखल करण्यात आले होते. सेप्टिक शॉकमुळे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर आणि सिस्टीमिक इन्फ्लॅमेटरी सिंड्रोमही होता. त्याला २१ जुलै रोजी मृत घोषित करण्यात आले आणि २३ जुलै रोजी त्याला झिकाचे निदान झाले.