जुन्नर : श्रीरंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी सोहळा श्री क्षेत्र आणे (ता. जुन्नर) येथे शुक्रवार ५ जानेवारीपासून सुरू झाला होता.यंदाच्या वर्षी आलेल्या भाविकांना ५० कढ़ाया आमटी केली होती. पहिल्यांदाच भाविकांना अल्पदरात घरी आमटी पार्सल देण्यात आली, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष मधुकर दाते यांनी दिली.
श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थानची यात्रा ही आमटी- भाकरीच्या महाप्रसादामुळे प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्वांत मोठा आमटी-भाकरीचा महाप्रसाद येथे भाविकांसाठी बनवला जातो. या वर्षी ४० कढ़ाया आलेल्या भाविकांना जेवणासाठी व १० कढाया वाटपासाठी भाविकांना घरी प्रसादासाठी बनवण्यात आल्या होत्या. यासाठी ३१४० किलो मसाला लागला असून यासाठी ८ लाख ८३ हजार रुपये खर्च आला आहे. ६ ते ७ हजार किलो भाकरी दहा गावातून वाजत गाजत आणल्या जातात.
घरातील प्रत्येकजण १ किलो पीठाच्या भाकरी देतात. येथील यात्रा उत्सवात स्वामीच्या दर्शनासाठी दर वर्षी हजारो भाविक येत असतात, देवस्थानला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला असून श्री रंगदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त गेल्या १३६ वर्षांपासून हरिनाम सप्ताह संपन्न झाला. यंदा सोपान महाराज सानप, कान्होबा महाराज देहूकर, विशाल महाराज खोले, बाळू महाराज गिरगावकर, पुरुषोत्तम महाराज पाटील, संतचरणरज वसंतगडकर, रामभाऊ महाराज राऊत यांची या काळात कीर्तन सेवा संपन्न झाली.
दरम्यान, आमटी मसाल्यामध्ये हळद, मिरची, काळीमिरी, दालचिनी, लवंग, जायपत्री, मायपत्री, खसकस, जिरी, मोहरी, गूळ, गरम मसाला, धना पावडर, बेसन पीठ, खोबरे, तूरडाळ, तेल, शेंगदाणे, आमसूल, आमटीचा वेगळ्ळा स्पेशल मसाला, अशा २० ते २१ पदार्थापासून ३१४० किलो मसाला बनवला. यासाठी ८ लाख ८३ हजार रुपयांचा खर्च आला.