लोणी काळभोर : फुरसुंगी (ता. हवेली) येथील 8 सायकलपटुंनी कमाल केली आहे. फुरसुंगी ते तिरुपती बालाजी असे सुमारे 1100 किलोमीटर अंतराची मोहीम अवघ्या पाच दिवसात पूर्ण केली आहे. त्यामुळे या सायकलपटूंचे पुणे जिल्ह्यातील सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.
अमोल वाजे, प्रशांत कामठे, जीवन पवार, प्रविण भोसले, तानाजी आडागळे, गुणवंत गायकवाड, गोरख कामठे, किरण कामठे (सर्व रा. फुरसुंगी ता. हवेली) असे सायकलवर मोहीम पूर्ण करणाऱ्या युवकांची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फुरसुंगी येथील सायकलपटू हे मागील काही वर्षापासून निरोगी राहण्यासाठी सायकल चालवीत आहेत. त्यांनी एकदा गप्पा मारता मारता ठरवले. आपण फुरसुंगी ते तिरुपती बालाजी असे सुमारे 1100 किलोमीटर अंतर सायकलीवर पूर्ण करायचे. सर्वांनी एकमताने या निर्णयाचे स्वागत केले. आणि त्यांनी मंगळवारी (4 जून रोजी) या प्रवासाला सुरवात केली.
फुरसुंगी (ता. हवेली) येथून सोमवारी सकाळी 8 सायकलपटू जीवनाश्यक वस्तू सोबत घेऊन सायकलवर निघाले. त्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे २८० किलोमीटर प्रवास करून अक्कलकोट येथे मुक्काम केला. त्यानंतर दुसरा मुक्काम यदगीर, तिसरा कर्नुल, चौथा कडाप्पा व पाचवा तिरुपती असा 1100 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 5 दिवसात पूर्ण केला आहे. आणि शनिवारी (ता.8) थेट तिरुपती मंदिर गाठले आहे. या प्रवासादरम्यान, सायकलपटूंना कोणताही त्रास झाला नाही तर सर्वांनी सायकल चालविण्याचा आनंद लुटला.
दरम्यान, या 8 सायकलपटूंमध्ये अमोल वाजे हे बुकमार्क इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक आहेत. तानाजी आडागळे हे आय टी इंजिनिअर तर प्रविण भोसले हे एक सहशिक्षक आहेत. गुणवंत गायकवाड हे टिळेकरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत. तर गोरख कामठे हे पत्रकार असून हवेली तालुका प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघाचे सदस्य आहेत. प्रगतशील शेतकरी प्रशांत कामठे तर जीवन पवार व किरण कामठे हे दोघेही उद्योजक आहेत.
सायकलपटूंचे होतेय सर्वत्र कौतुक
फुरसुंगी येथील हे 8 सायकल पटू विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र या सर्वांची एकमेकांशी घट्ट मैत्री आहे. या सायकलपटूंनी अवघ्या 5 दिवसात 1100 किलोमीटर अंतर सायकलवरून केले आहे. रोज त्यांनी जवळजवळ 220 ते 230 किलोमीटर अंतर पूर्ण करून एक नवा विक्रम केला आहे. त्यामुळे या 8 सायकलपटूंचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. तसेच त्यांच्यावर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे.
सायकलपटू परतीच्या मार्गावर
सायकलपटूंनी फुरसुंगी ते तिरुपती बालाजी मोहीम शनिवारी (ता.8) पूर्ण केली. मोहीम पूर्ण केल्यानंतर सायकलपटूंनी तिरुपती बालाजीचे दर्शन केले. त्यानंतर संध्याकाळी मुक्काम ठोकला. आणि आज रविवारी (ता.9) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सायकलपटू दोन चारचाकी गाड्यांच्या माध्यमातून परतीच्या मार्गाला निघाले आहेत.
हवेली तालुका प्रिंट व डिजिटल मिडिया पत्रकार संघाचे सदस्य गोरख कामठे म्हणाले, सायकल चालवणे हे आता केवळ मनोरंजनाची बाब राहिली नाही. बालपणाची हौस आता निरोगी जीवनासाठी नितांत गरजेची बनली आहे. सध्याच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात तणावमुक्त व आनंददायी जीवन जगण्यासाठी सायकल चालवणे, हे लाभदायक ठरत आहे. प्रत्येकाने सवलतीनुसार दररोज सकाळ किंवा संध्याकाळी किमान एक तास सायकल चालविण्याची सवय करून घ्यावी.
टिळेकरवाडीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गुणवंत गायकवाड म्हणाले, शरीराचे संपूर्ण संवर्धन हा व्यायाम केल्याने प्राप्त होते. स्नायू, सांधे, हाडे त्यामुळे मजबूत होतात व मसक्युलर व कार्डिओ वासक्युलर इंडोरन्स विकसित होतो. यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात सायकल चालविण्याची सवय अंगी बाळगावी तसेच निरोगी व आनंददायी, तणावमुक्त जीवनशैली स्वीकारावी.
ग्रूपमधील सर्व सदस्य सायकलप्रेमी असून सायकलिंग हा सर्वांचा छंद आहे. यापूर्वी अक्कलकोट, तुळजापुर व पंढरपूर अशी सायकलिंग राइड पूर्ण केल्या आहेत. एक मोठी राईड करण्याचा आमचा मानस होता. त्यानुसार आम्ही फुरसुंगी येथील ग्रामदैवत शंभू श्री शंभू महादेवाचे दर्शन घेऊन तिरुपतीचा प्रवास सुरू केला. आणि ११०० किलोमीटरचा टप्पा यशस्वी पार केला. सायकलिंगचा व्यायाम हा पर्यावरण पूरक आहे. शारीरिक व मानसिक कणखरता वाढवण्याबरोबरच निसर्गाच संवर्धन व संरक्षणासाठी आवश्यक आहे. सायकलिंगमुळे इंधन बचत होते व हवाप्रदुषण टाळले जाते.
प्रविण भोसले-(सहशिक्षक, फुरसुंगी)