लोणी काळभोर : आगामी सण, उत्सव व लोकसभा सार्वत्रिक निकाडणुका २०२४ च्या पार्श्वभूमीवर उरुळी देवाची व वडकी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणी काळभोर पोलिसांनी शुक्रवारी (ता. २२) पथ संचलन काढले होते. पोलिसांच्या ताफ्याने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते.
वडकी गावठाणापासून शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पथ संचलनाला सुरुवात केली. त्यानंतर हे संचलन वडकी नाला, वडकी फाटा व १० वा मैल व पुढे उरुळी देवाची ग्रामपंचायत हद्दीत डॉ. आंबेडकर चौक व या दोन्ही गावातील मंदिरे, मस्जिद येथे पार पडले. या पथ संचलनाचे आयोजन लोणी काळभोर पोलीस व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
दरम्यान, सर्वसामान्य माणसाच्या जीवनात शांतता निर्माण करणाऱ्यांसाठी आम्ही सदा तत्पर आहोत, तसेच जर कोणी समाजकंटक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच पोलीस मदतीसाठी ११२ या नंबर क्रमांकवर कॉल करावा, असे आवाहन नागरिकांना पथ संचलनादरम्यान करण्यात आले.
या वेळी हडपसरच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाखेचे दत्ताराम बागवे, पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख, गोपनीय अंमलदार रामदास मेमाणे, रवी आहेर, इतर अधिकारी व पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.