पुणे : डिसेंबरमध्ये महावितरण पुणे प्रादेशिक विभागात वीज चोरीची ७७१ प्रकरणे व अनधिकृत वीज वापराची २३८ प्रकरणे उघडकीस आलेली आहे. मागील महिन्यात वीज चोरीविरुद्ध कडक मोहीम राबविण्यात आलेली असून ७४०४ वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यात २ कोटी ५५ लाख रुपयांची एकूण ७७१ वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली आहे.
तसेच ८१ लाख २३ हजार रुपयांची २३८ अनधिकृत वीज वापराची प्रकरणे उघडकीस आलेली आहे. यात एकूण ४१७ प्रकरणात१४९ लाख रुपये वसूल करण्यात आलेले आहेत. पुणे परिमंडळात एकूण दोन हजार ९६२ वीज जोडण्या तपासण्यात आल्यात. यात अनधिकृत वीज वापराची १४४ प्रकरणे व वीज चोरीची २७२ प्रकरणे उघडकीस आली आहे.
बारामती परिमंडळात एकूण दोन हजार ३६१ वीज जोडण्या तपासण्यात आल्यात. यात अनधिकृत वीज वापराची ५३ प्रकरणे व वीज चोरीची 359 प्रकरणे उघडकीस आलेली आहे.
कोल्हापूर परिमंडळात एकूण दोन हजार ८१ वीज जोडण्या तपासण्यात आल्यात. यात अनधिकृत वीज वापराची ४१ प्रकरणे व वीज चोरीची १४० प्रकरणे उघडकीस आलेली आहे.
वीज चोरीविरुद्ध मोहीम अधिक तीव्र करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक श्री अंकुश नाळे यांनी दिले आहेत. विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ व १३६ नुसार वीज चोरी हा दंडनीय अपराध असून यात आरोपींना ३ वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज चोरीपासून परावृत्त व्हावे, असे आवाहन महावितरणाकडून करण्यात आले आहे.