पुणे : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय जोशी, त्यांचा मुलगा आणि पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जामीनदाराची बनावट स्वाक्षरी करून ७७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गॅस एजन्सीत पैसे गुंतविल्यास चांगला परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वी जोशी यांच्यासह मुलाविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते.
याबाबत तानाजी दिनकर मोरे (वय ४२, रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक उदय त्र्यंबक जोशी (वय ६५), त्यांचा मुलगा मयुरेश (वय ४६, दोघे रा. पानमळा, सिंहगड रस्ता), निनाद नागरी पतसंस्थेचे कोषाध्यक्ष रामलिंग शिवगणे आणि सचिव अशोक कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहिीनुसार, उदय जोशी आणि त्यांचा मुलगा मयुरेश यांची गॅस एजन्सी आहे. गॅस एजन्सीत पैसे गुंतविल्यास चांगला परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी यापूर्वी जोशी यांच्यासह मुलाविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. मयुरेशने सदाशिव पेठेतील निनाद नागरी पतसंस्थेतून कर्ज घेतले होते. दरम्यान, तक्रारदार तानाजी मोरे यांना कर्ज प्रकरणाची माहिती न देता कर्ज प्रकरणावर त्यांची बनावट स्वाक्षरी केली. पतसंस्थेतील पदाधिकारी उदय जोशी, रामलिंग शिवगणे, अशोक कुलकर्णी तसेच संचालक मंडळातील अन्य संचालकांशी संगनमत करून ७७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. कर्ज प्रकरणाची माहिती मोरे यांना न देता फसवणूक केली, तसेत कर्जाची परतफेड केली नाही.