दौंड : स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील मल्लिनाथ आश्रम येथे कोविड काळात पुण्यातील एका दानशूर व्यक्तीने शंभर बेड कोविड सेंटरला भेट दिले होते. कालांतराने कोविड सेंटर बंद झाल्यानंतर मल्लिनाथ आश्रमातील कोविड सेंटरमधून दान दिलेले ७४ बेड चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. पैकी २५ बेड रावणगाव येथील तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्यांनी देऊळगाव राजे येथील कोविड सेंटरला दिले. सध्या या बंद असलेल्या कोविड सेंटरमध्ये एकच बेड शिल्लक आहे, अशी माहिती शिवसेना तालुका उपप्रमुख रमेश पवळ यांनी दिली.
संपूर्ण देशावर कोविडचे संकट असताना दानशूर व्यक्तींनी एवढी मोठी मदत केली. मात्र, भुरटे पुढारी चोरी करू लागले तर इतर कामांसाठी गावाला दानशूर व्यक्ती मदत कशी करतील, असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे. स्वामी चिंचोली गावात या चोरीची चर्चा रंगली आहे.
या प्रकाराबाबत रावणगाव येथील डॉ. मोहन पांढरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, वरिष्ठांच्या पत्रानुसार तेथे १०० बेड मिळाले होते; परंतु सध्या तेथील बेड कुठे आणि कोण घेऊन गेले, याबाबत आम्हाला काहीच माहिती नाही. आम्ही वरिष्ठांशी पत्रव्यवहार करून माहिती विचारली आहे. माहिती उपलब्ध झाल्यानंतर सविस्तर सांगितले जाईल. या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.
स्वामी चिंचोली येथील मल्लिनाथ आश्रम येथे स्थानिकांकडे चौकशी केली असता, तेथे जुने साहित्य, बादल्या, सलाईन स्टँण्ड, फ्रिज अशा अनेक वस्तू आस्ताव्यस्त स्थितीत पडलेल्या आढळल्या. तेथील कर्मचारी, पुजारी यांनी सांगितले की, बेड कोण घेऊन गेले, याबद्दल आम्हाला माहिती नाही. ॲम्ब्युलन्स आणि टेम्पोमधून बेड घेऊन गेले आहेत.
याबाबत दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांना संपर्क साधला असता ते म्हणाले की, संपूर्ण प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यात येईल. या संपूर्ण प्रकारात कोणतीही कागदपत्रे, रेकॉर्ड आणि नोंदी अद्ययावत ठेवलेल्या नाहीत. हे बेजबाबदारीचे लक्षण आहे. कोविड सेंटरमध्ये नेमणूक असलेले आरोग्य सहाय्यक, सीएचओ आणि एएनएस म्हणून कोण होते. त्यांनी संबंधित कोविड कार्यकाळात संपूर्ण नोंदी का ठेवल्या नाहीत. या गंभीर प्रकरणात हे कर्मचारी सामिल आहेत का? याची चौकशी केली जाईल.
संबंधितांवर काय कारवाई होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.