शिरूर: रब्बी हंगामातील आतापर्यंत शेतकऱ्यांच्या ७० टक्के पेरण्या उरकल्या आहेत. यावर्षी सर्वत्र पाऊस चांगला पडला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वच धरणे भरलेली आहेत. तसेच जमिनीतील पाणी पातळीही चांगली वाढलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या पेरण्या केलेल्या आहेत. तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक यांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात रब्बी हंगामात होणाऱ्या पेरणीचे सरासरी क्षेत्र ३७ हजार ७९९ हेक्टर एवढे आहे. त्यापैकी आतापर्यंत २६ हजार ३३० हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. एकूण ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तालुक्यात सर्वाधिक ज्वारीची १० हजार ६०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभरा १ हजार ७२२ हेक्टर, गव्हू २ हजार १११हेक्टर, मका १ हजार ६२० हेक्टर, इतर कडधान्य १७० हेक्टर, तेलबिया १४२ हेक्टर अशी पेरणी झाली आहे.
शिरूर तालुक्यात चासकमान, डिंभे, घोड धरण व घोडनदी, भीमानदी असल्याने बाजूची शेती बागायती झाली आहे. त्यामुळे ऊसाचे क्षेत्रही मोठे वाढले आहे. तालुक्यात ४० हजार ५५८ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. तसेच इतर तरकारी पिकेही शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहेत. फळबागाही वाढल्या आहेत. ऊसाचे गाळप झाल्यावर शेतकरी कांदा लागवड करतात. परंतु, अनेक शेतकऱ्यांचा ऊस अजुनही तोडण्यात आलेला नाही. त्यामुळे कांदा लागवड खोळंबली आहे. तालुक्यात कांद्याचे क्षेत्र सरासरी क्षेत्र ९ हजार २०० हेक्टर एवढे आहे. परंतु १० हजार ४५७ हेक्टर क्षेत्रावरच कांदा लागवड झाली आहे. गेल्या वर्षी कांद्याचे बाजारभाव चांगले होते. त्यामुळे कांदा लागवड मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.