लोणीकंद : सासवड येथील दहीहंडीचा कार्यक्रम उरकून कोलवडी येथील घरी येत असताना टोळक्याने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. ही घटना 29 ऑगस्ट रोजी कोलवडी परिसरात घडली होती. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात एन्जॉय ग्रुपच्या सात सदस्यांना सापळा रचून अटक केली आहे.
शुभम ऊर्फ मॅटर अनिल जगताप, (वय 27), सुमित उत्तरेश्वर जाधव, (वय 26), अमीत म्हस्कु अवघरे (वय 27), ऑकार ऊके मैथ्या अशोक जाधव (वय 24), राज बसवराज स्वामी (वय 26), लतिकेश गौतम पोळ (वय 22), अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय 27) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नवे आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दहीहंडीचा कार्यक्रम उरकून कोलवडी येथील घरी येत होते. त्यावेळी आरोपी सुमित जाधव आणि त्याचे सहकारी यांनी पुर्ववैमनस्यातुन सापळा रचून फिर्यादी आणि साक्षीदार यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याची दखल घेत लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी सदर गुन्ह्याच्या तपासासाठी दोन पथके तयार केली.
त्यानुसार सासवड, हडपसर, कोंढवा परिसरात एक पथक तसेच चाकण, पिंपरी चिंचवड, मुळशी परिसरात दुसरे पथक रवाना केले. या तपासात हडपसर, स्वारगेट, लोहियानगर येथील एन्जॉय ग्रुपमधील सदस्यांनी हा गुन्हा केल्याची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तपास केला असता हडपसर नेकराईनगर परिसरातील एन्जॉय ग्रुपचे सदस्य यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार आरोपींचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आरोपी शुभम ऊर्फ मेंटर अनिल जगताप व सुमित उत्तमेश्वर जाधव यांना मुंढवा परिसरात सापळा रचुन तपास पथकाने ताब्यात घेतले. आरोपींकडे अधिक विचारपुस केली असता इतर आरोपी नवले ब्रिज कावन परिसरात असल्याचे सांगितले. त्यानुसार सापळा लावून आरोपी अमीत म्हस्कु अचचरे, अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे, ओकार ऊर्फ भैय्या अशोक जाधम, लतिकेश गौतम पौळ, राज बसवराज स्वानी यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान, या गुन्ह्यात सात आरोपींना अटक करून त्यांचेकडुन देशी बनावटीचे एकुण 07 पिस्टल, 23 जिवंत काडतुसे, गुन्हा करण्यासाठी वापरलेली दोन वाहने, 7 मोबाईल फोन, असा एकुण 9 लाख 14 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.