पुणे : पुण्यातील नऱ्हे भागात दारुच्या नशेत एका तरुणाने सात दुचाकी पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. बबलू इस्लाम अन्सारी (वय-१९, रा. अश्विनी अपार्टमेंटच्यामागे, चव्हाण चाळ, नऱ्हे) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत ओंकार महेश धानेपकर (वय-२४, रा. अश्विनी अपार्टमेंटजवळ, नऱ्हे) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सिंहगड रोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बबलू कामधंदे करत नसून त्याला दारु पिण्याचे व्यसन आहे. अश्विनी अपार्टमेंटसमोर असलेल्या मोकळ्या जागेत रहिवासी वाहने लावतात. मंगळवारी ४ जूनला मध्यरात्री बबलूने अश्विनी अपार्टमेंटसमोर लावलेल्या सात दुचाकी पेटवून दिल्या. या घटनेत दोन दुचाकी पूर्णपणे जळाल्या असून पाच दुचाकींना झळ पोहोचली आहे.
या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला असता आरोपी बबलूने दुचाकी पेटवून दिल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड करत आहेत.