यवत : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग – ०९ वरील सेवा रस्त्याच्या कामासाठी सुमारे ६८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी दिली. या कामाची निविदा प्रक्रिया देखील अंतिम टप्प्यात असून, प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दौंड तालुक्यातून सुमारे ६५ किमीपेक्षा जास्त लांबीचा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग गेला असून, त्याचे विस्तारीकरण २०१२-१३ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्यावेळी अनेक गावांमध्ये सर्व्हिस रोड (सेवा रस्ता) ची कामे अपूर्ण राहिली होती. यामुळे होणाऱ्या छोट्या मोठ्या अपघातामुळे अनेक नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागला होता. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन दौंड तालुक्याचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग – ०९ वरील दौंड तालुका हद्दीतील यवत, भांडगाव, वाखारी, चौफुला, वरवंड, पाटस, मळद, खडकी, स्वामी चिंचोली येथे विविध ठिकाणी सुमारे ६८ कोटी रुपयांच्या व ३२ किमी लांबीच्या सर्व्हिस रोडच्या (सेवा रस्ता) कामास मंजुरी मिळाली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती देखील आमदार ॲड. राहुल कुल यांनी दिली.
दौंड तालुक्यातील नागरिकांच्या वाहतुकीच्या व रस्ते सुरक्षितेच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या या निर्णयाबद्दल दौंड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने आमदार ॲड. राहुल कुल यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे आभार देखील मानले आहेत.