गणेश सुळ
केडगाव : दौंड तालुक्यातील देलवडी येथील राजे ग्रूप व देलवडी ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ६५ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले.
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान, असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढ्यांमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने राजे ग्रुप व देलवडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने (ता. १८) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमात भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विकास शेलार, सभापती शिवाजी वाघोले, सरपंच नीलम काटे, दत्तात्रय शेलार, सुरेश चांदगुडे, राजाभाऊ काटे, विकास टकले, बाळासाहेब जाधव, किशोर शेलार, बापूराव झांजे आदी मान्यवरांसह राजे ग्रूपचे सदस्य व देलवडी ग्रामस्थ उपस्थित होते.
अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाधिक रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. शिबिरात जवळपास ६५ बाटल्या रक्त संकलन केले. सामान्य जनतेला मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमप्रसंगी १७ वर्षीय वयोगटातील मुलांचे एकदिवसीय क्रिकेटचे सामने भरविण्यात आले होते. या वेगवेगळ्या उपक्रमांचा लाभ घेत देलवडी ग्रामस्थांनी एक आदर्श सर्वांसमोर मांडला.