पुणे : नुकतीच विधानसभा निवडणुक पार पडली असून निकाल सुद्धा जाहीर झालं आहे. यामध्ये महायुतीचा दणदणीत विजय झाला असून महाविकास आघाडीलचा दारुण पराभव झाला आहे. अशातच विधानसभा निवडणुकीत बनावट मतदान झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे विधानसभा निवडणुकीत ८ शहरी मतदारसंघात बनावट मतदान झाले असल्याची माहिती मिळत आहे.
पुण्यातील ८ मतदारसंघात ६०० हून अधिक बनावट मतदान झाले असून काही त्रुटींमुळे टपाली मतदान रद्द करण्यात आले आहे. ३०० टपाली मतदारांचे मतदान रद्द करण्यात आले आहे. या बनावट मतदानापैकी सर्वाधिक मतदान हे वडगाव शेरीत झाले असल्याची माहिती समोर येत आहे. वडगाव शेरीत १६२ बनावट मते देण्यात आली आहेत. त्यानंतर कोथरुड मतदारसंघात ९३ बनावट मते दिले गेल्याचे उघड झाले आहे. या दोन्ही मतदारसंघातील बनवाट मतपत्रिका बाद करण्यात आल्या आहेत.
वडगाव शेरी आणि कोथरुडमधील टपालने आलेल्या अनुक्रमे ६५ आणि १८ मतपत्रिका बाद करण्यात आल्या आहेत. बनावट मतदानाच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून बनावट मतदानाचे प्रकार वाढत आहेत. विधानसभा निवडणुकीत बनावट मतदारांची संख्या वाढली असल्याचे निरीक्षण जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून नोंदवण्यात आले आहे.
पुण्यातील ८ मतदारसंघात बनावट मतदान नोंदवले गेले असून त्यात हडपसरमध्ये ७८ बनावट मतदान झाले आहे. खडवासल्यात ७५, पर्वतीत ६१, शिवाजीनगरमध्ये आणि पुणे कन्टेन्मेंटमध्ये ४९ आणि कसबा मतदारसंघात ५२ बनावट मते नोंदवली गेली आहेत. एकूण ६१९ बनावट मतदानाची नोंद करण्यात आली आहे.