लोणी काळभोर : महाराष्ट्रातील शैक्षणिक विकासाचा इतिहास लिहिताना शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांनी शिक्षणक्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा, नोंद घेतल्याशिवाय तो पूर्ण होऊच शकत नाही. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य फार महत्वाचे व अद्वितीय आहे, असे प्रतिपादन पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सिताराम गवळी यांनी केले आहे.
शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या 37 व्या स्मृतिदिनानिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) येथे शाखास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन मंगळवारी (ता.6) करण्यात आले होते. या स्पर्धेत तब्बल सहाशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन प्राचार्य सिताराम गवळी यांनी केले आहे. यावेळी कलाशिक्षक पराग होलमुखे, मंगल बागडे, पर्यवेक्षक नरसिंह जाधवर, एस व्ही शिंदे, सैफुल शेख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य गवळी म्हणाले, बापूजींनी शिक्षणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी स्वतःला झोकून दिले. तन, मन व धन अर्पन केले. अपार कष्ट उपसले. दारिद्र्य, अज्ञान व अंधश्रद्धा यात पिचत पडलेल्या दुःखी समाजाचा उद्धार करावयाचा असेल तर शिक्षणासारखे दुसरे प्रभावी साधन नाही हे बापूजींनी ओळखले होते. ‘ जीवनात उदात्तता वाढली पाहीजे. बोलण्याप्रमाणे कृती असली पाहीजे. तरच स्वतंत्र देशातील नागरिक सुसंस्कारी होतील. असे गवळी यांनी सांगितले.
दरम्यान, चित्रकला स्पर्धा विवेकानंद शिक्षण संस्थेच्या तिन्ही शैक्षणिक संकुलामधून एकाच वेळी घेण्यात आली. या स्पर्धेचे आयोजन पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल, इंग्लिश मीडियम स्कूल व कन्या प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी विद्यालयातून दोन गट तयार करण्यात आले होते. पाचवी ते सातवीचा लहान गट तर आठवी ते दहावीचा मोठा गट असे दोन गट तयार करण्यात आले होते.
लहान गटासाठी आवडता खेळ, शाळेतील वृक्षारोपण, फळ विक्रेता अशी चित्रे काढायची होती. तर मोठ्या गटासाठी शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे व्यक्तिमत्व, ग्राम स्वच्छता अभियान, धूम्रपान हि सामाजिक समस्या या विषयावर चित्र काढायची होती. या साठी विद्यालयाकडून कोणतेही शुल्क आकारले नव्हते. या स्पर्धेत पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलच्या सुमारे 300 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर इंग्लिश मीडियमच्या 200 तर कन्या प्रशालेच्या 100 अशा एकूण 600 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्स्पुर्त प्रतिसाद नोंदविला.