पुणे : राजधानी दिल्लीत दाट धुके पसरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचा मोठा परिणाम विमान वाहतुकीवर झाला आहे. पुण्यातून दिल्लीसह प्रयागराज, राजकोट, अहमदाबाद या ठिकाणी जाणारी पाच विमाने आणि चेन्नईला जाणारे एक विमान अशा सहा विमानांची उड्डाणे रविवारी रद्द करण्यात आली आहेत. दिल्लीत पडलेल्या दाट धुक्यामुळे या विमानसेवा रद्द करण्यात आल्या आहेत, याबाबतची माहिती पुणे विमानतळ प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, खराब हवामानाचा फटका हवाई वाहतुकीला सतत बसत आहे. पुणे ते दिल्ली विमानसेवेला प्रवाशांची मोठी गर्दी आहे. पुण्यातून अनेक उड्डाणे दिल्लीसाठी दररोज होत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत मोठ्या प्रमाणात धुके पडत असल्यानमुळे विमान उड्डाणावर त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे. याच पार्शवभूमीवर रविवारी १४ जानेवारीला विमानांचे मार्ग वळवण्यात आल्याची माहिती पुणे विमानतळ प्रशासनाने दिली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, ६ फ्लाइट जयपूरच्या दिशेने, तर एक फ्लाइट मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली आहे. ही सर्व उड्डाणे पहाटे ४:३० ते सकाळी ७:३० च्या दरम्यान वळवण्यात आली आहेत. दिल्लीतील कडाक्याच्या थंडीबरोबरच दाट धुक्याचा दुहेरी सामना करावा लागत असून, पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहणार आहे. त्याचा परिणाम विमान वाहतुकीवर होईल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.