पुणे : रस्त्यांच्या दुरावस्था, अरुंद रस्ते व कोंडीत अडकणाऱ्या पुणेकरांना दररोज गुदमरलेल्या अवस्थेतून प्रवासाचा त्रास सहन करावा लागतो. त्यात वाहतूक नियमांचा दंड देखील तितक्याच पटीने सोसावा लागत असल्याचे दिसत आहे. वाहतूक कोंडीच्या त्रासातून वाट काढणाऱ्या पुणेकरांवर गेल्या सहा महिन्यात नियमांचे बोट ठेवून पुणे पोलिसांनी तब्बल 47 कोटी रुपयांचा दंड ठोकला आहे.
पुणे शहरात उद्योग उभे राहिले. शिक्षणाच्या चांगल्या संधी निर्माण झाल्या. यामुळे पुणे शहराचा विकास चौफेर झाला. बाहेरुन पुणे शहरात येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. यामुळे सर्वात जास्त वाहने पुणे शहरात आहे. पुणे शहरातील वाहतुकीची दुरवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी होत असून नागरीकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
अशाही परिस्थित मात्र, पुणेकरांना तिसरा त्रास हा वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या दंडाचा सोसावा लागत आहे. वेगवेगळ्या कारणांसाठी पुणेकरांना वर्षाला पुणे पोलिसांकडून कोट्यवधी रुपयांचा दंड ठोकला जात आहे. त्यामुळे आधीच सुविधा न मिळण्यासोबत प्रचंड वाहतूक कोंडीतून वाट काढताना पुणेकरांना दंडाचा देखील त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या सहा महिन्यात (1 जानेवारी ते 21 जुलै) पोलिसांनी तब्बल 5 लाख 86 हजार 394 वाहनांवर कारवाईकरत त्यांना 47 कोटी 31 लाख 56 हजार 200 रुपयांचा दंड ठोकला आहे. त्यातील 13 कोटी 44 लाख 32 हजार 100 रुपयांचा दंड वसूल झाला आहे. तर, 33 कोटी 87 लाख 24 हजार 100 रुपयांचा दंड पेटींग आहे. तसेच केवळ 6 महिन्यात पोलिसांनी हेल्मेट न परिधान करणाऱ्या 1 लाख 17 हजार 118 वाहन चालकांवर कारवाई केली आहे. हेल्मेट सक्तीचाच सर्वाधिक दंडही दरवर्षी पुणेकरांना ठोकला जातो.
वाहनावर झालेल्या कारवाईची संख्या…
– ट्रिपल शीट – 19234 वाहनांवर कारवाई
– राँग साईड – 18731 वाहनांवर कारवाई
– राँग नंबर प्लेट व फॅन्सी नंबर प्लेट – 931 वाहनांवर कारवाई
– सायकल ट्रॅक किंवा फुटपाथवरून वाहन चालवणे – 1929 वाहनांवर कारवाई
– रॅश ड्रायव्हींग – 4120 वाहनांवर कारवाई
– सिग्नल जपींग – 30,300 वाहनांवर कारवाई
– ड्रंक अँड ड्राईव्ह – 1953 वाहनांवर कारवाई