पुणे: जिल्ह्यात लष्करी दलात काम करणारे ५ हजार ६०० मतदार आहेत. त्यांना ई-मेलद्वारे मतपत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. मतमोजणीच्या दिवशी अर्थात २३ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत केलेले मतदान ग्राह्य धरले जाईल, अशी माहिती निवडणूक शाखेकडून देण्यात आली. जिल्ह्यात लष्करी, निमलष्करी, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या सेवा (सर्व्हिस) मतदारांना इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टिम (ईटीपीबीएस) या संगणकीय प्रणालीद्वारे मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
निवडणूक शाखेकडून या मतदारांसाठी ऑनलाइन मतपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. ईटीपीबीएस प्रणालीमध्ये सर्व मतदारांची नावे संगणकीकृत करून ई-मेलद्वारे त्यांना मतपत्रिका पाठविल्या आहेत. संबंधित मतदाराने मतपत्रिकेची छायांकित प्रत काढून मतदान करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या पत्त्यावर टपालाद्वारे पाठवावी लागणार आहे, अशी माहिती समन्वयक अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.
मतदानासाठी संबंधित मतदाराची सहमती आल्यानंतर मतदानासाठीचा अर्ज, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी आदी अर्जात समाविष्ट करण्यात येते. ज्या मतदारसंघात जवानांचे नाव समाविष्ट आहे, त्यानुसार मतपत्रिका जवानांना ई-मेलवर पाठविल्या जातात. जवानांना मतपत्रिका डाउनलोड करण्यासाठी गुप्त क्रमांक (ओटीपी) मोबाइलवर मिळाल्यानंतर छायांकित प्रत काढावी लागते. मतदान केल्यानंतर मतपत्रिका बंद पाकिटात टाकून पोस्टाद्वारे मतदारसंघनिहाय निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठवावी लागते. मतपत्रिकेची सत्यता पडताळण्यासाठी त्यावरील बारकोड क्रमांक स्कॅन करून मतमोजणी करण्यात येईल. जिल्ह्यात सर्वाधिक सेवा मतदार आंबेगावमध्ये ६३३, तर पुरंदर मतदारसंघात ६१३ मतदार आहेत.
मतदारसंघनिहाय सेवा मतदार
जुन्नरः २७७
आंबेगाव-शिरूर: ६३१
खेड-आळंदी: ३०८
शिरूर-हवेली : ४०३
दौंडः ३१५
इंदापूर : २६५
बारामतीः ५६३
पुरंदर-हवेलीः ६३१
भोर-वेल्हा मुळशी : २९२
मावळ : १२९
चिंचवड : १७२
पिंपरी: १३१
भोसरी: १७१
वडगावशेरीः ४३८
शिवाजीनगर : १२०
खडकवासला: १६४
पर्वती: ६४
हडपसर : २६३
पुणे कॅन्टोन्मेंट : १३८
कसबा पेठः ३७
एकूण: ५६००