पुणे : पुणे शहरात गेल्या सहा वर्षांत आगीच्या १३ हजार घटना, तर गेल्या तीन वर्षांत ५४६ घटना घडल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. आग प्रतिबंधक उपाययोजनाही पुणे शहरात सुरू असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आगीच्या घटना कमी करण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून वेळोवेळी गृहनिर्माण सोसायट्या, शाळा, महाविद्यालये, व्यापारी संकुले, रुग्णालये, झोपडपट्टी, औद्योगिक वसाहती, शासकीय कार्यालयात आग प्रतिबंधक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.
आग न लागण्यासाठी करावयाची कार्यवाही, आग नियंत्रणात आणण्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रात्यक्षिके नागरिकांना दाखविण्यात येत आहेत. अग्निशमन दलाकडून हे काम निरंतर सुरू आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चेतन तुपे, वडगांवशेरीचे आमदार सुनील टिंगरे आणि शिरूरचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी यासंदर्भातील प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित केला.
शाॅर्टसर्किट, घरगुती गॅस गळती, पेटते दिवे, जळत्या सिगारेटची थोटके फेकणे या मानवी चुकांमुळे शहरात गेल्या तीन वर्षात ५४६ आगीच्या घटना घडल्या आहेत.