पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूककोंडी सोडविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून १७२ किलोमीटर आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता (रिंग रोड) प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रस्तावित केलेल्या वर्तुळाकार रस्त्याच्या पूर्व मार्गातील हवेली आणि खेड तालुक्यातील जमिनींच्या संपादनाबाबत निवाडा जाहीर केला आहे.
२७ फेब्रुवारी रोजी सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी राज्याचे वित्तमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी साडेदहा हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यांपैकी हवेली आणि खेडमधील १५ गावांसाठी ५४१ कोटी रुपये जिल्हा प्रशासनाने निश्चित केले असून या प्रकल्पाच्या भूसंपादनाला वेग आला आहे.
शहरातील १७२ किलोमीटर आणि ११० मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. पूर्व मार्गातील मावळ तालुक्यातून ११, खेड १२, हवेली १५, पुरंदरमधील ५ आणि भोरमधील ३ गावांतून प्रस्तावित आहे. तर पश्चिम मार्गावरील भोर तालुक्यातील १, हवेली ११, मुळशी १५ आणि मावळ तालुक्यातून ६ गावे बाधित होणार आहेत. पश्चिम मार्गावरील ३४ पैकी ३१ गावांमधील ६४४ हेक्टर जमिनीच्या संपादनाचे काम पूर्ण झाले असून त्यासाठी २ हजार ९७५ कोटी रुपये मोबदला दिला आहे.
भोर तालुक्यातील ५ गावे वगळून शिवरे गावाचा समावेश केल्याने या गावातील मूल्यांकनाचे दरनिश्चितीचे काम आचारसंहितेपूर्वी सुरू करण्यात आले होते. पश्चिम मार्गाच्या भूसंपादनासाठी यापूर्वीच गृहनिर्माण आणि नागरी विकास महामंडळाकडून (हुडको) दहा हजार कोटींचे कर्ज घेण्यात आले आहे. पूर्व मार्गाच्या भूसंपादनासाठी रस्ते महामंडळाला निधीची गरज होती.
त्यामुळे रस्ते महामंडळाने राज्य सरकारकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात वर्तुळाकार रस्त्याच्या भूसंपादनासाठी तब्बल १० हजार ५१९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. दरम्यान, हवेली तालुक्यातील गावांसाठी ६४ कोटी २९ लाख रुपये, तर खेड तालुक्यातील गावांसाठी सुमारे ४७६ कोटी ७२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.