पुणे : महाराष्ट्र राज्य सरकारने आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांसाठी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा पुणे जिल्ह्यातील ५३३ लोकांना लाभ होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या काळात देशात आणीबाणी घोषित करण्यात आली होती. या काळात ज्यांना तुरुंगवास भोगावा लागला होता त्यांचा सन्मान करण्याचा प्रस्ताव 2 जानेवारी 2018 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला होता. फडणवीस मुख्यमंत्री होते.
दरम्यान महाविकास आघाडी सरकारने आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्यांची मासिक पेन्शन योजना बंद केली होती. आता पुन्हा एकदा सरकार बदलले असून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मानधन पुनः सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या संदर्भातील विनंती लोकप्रतिनिधी यांनी शासनास केली होती. या योजनेंतर्गत १ ऑगस्ट, २०२२ पासून मानधन अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा १० हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस / पतीस ५ हजार रुपये मानधन, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना दरमहा ५ हजार रुपये तर त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस / पतीस २ हजार ५०० रुपये इतके पूर्वीप्रमाणेच मानधन देण्यात येणार आहे.