पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या नावाने त्यांच्या अधिकाऱ्याला फोन करुन सायबर चोरट्यांनी 50 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 1 जुलै ते 10 जुलै या काळात कुमार प्रॉपर्टीजच्या कार्यालयामध्ये घडला आहे याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत,कंपनीच्या वतीने मितेश प्रयन्त उदेशी (वय-47 रा. टॉवर 4 सी इन्फिनीटी, केशवनगर, मुंढवा) यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अग्निवेश राय असे नाव सांगणाऱ्या सायबर चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मितेश उदेशी हे पुणे कॅम्प परिसरातील कुमार प्रॉपर्टीज आणि प्रमोटर्स प्रा. ली.याठिकाणी चीफ मॅनेजिंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत .ते त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत होते, तेव्हा त्यांना एक मिस कॉल आला. त्यांनी ट्रू कॉलरवर तपासले असता तो नंबर त्यांचे सीईओ राजस जैन यांचा असल्याचे आढळून आले. त्यांना परत फोन केल्यावर त्यांनी कट केला.त्यानंतर पुन्हा सायबर चोरट्याने कंपनीच्या लँण्ड लाईन वर फोन करुन राजस जैन बोलत असल्याचे सांगितले .
त्याने ऑपरेटला मितेश यांना मोबाईलवर पाठवलेला मेसेज तात्काळ बघा असा निरोप दिला. तसेच मी मिटींगमध्ये आहे, म्हणून फोन उचलता येत नाही असे सांगितले. मितेश यांनी मेसेज वाचला अन अग्निवेश राय या नावाच्या बँक खात्यात 49 लाख 60 हजार 400 रुपये तात्काळ ट्रान्स्फर करण्यास सांगितले. त्यानुसार फिर्य़ादीने कंपनीच्या बँक खात्यातून पैसे पाठवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मेसेज करुन 48 लाख 60 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. तसेच दुपारी ऑफिसमध्ये सह्या करतो असे सांगितले.
मितेश यांनी फोन केला असता सायबर चोरट्याने फोन कट केला. परंतु, फिर्यादी याना संशय आल्याने त्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना समजले कि, राजस जैन यांच्याकडे दुसरा मोबाईल नाही. त्यावरून मितेश यांनी राजस यांच्या मुळ मोबाईल नंबरवर फोन केला असता ते म्हणाले मी असा कोणाताही मेसेज केला नाही, आणि कोणालाही पैसे पाठवायला सांगितले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लष्कर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.