पुणे : कमी भावामध्ये हिऱ्यांचा नेकलेस आणि हिऱ्यांच्या बांगड्या देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची सराफ व्यावसायिकाकडून तब्बल ५० लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात पेठे ज्वेलर्सचे मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आयडियल कॉलनी मधील चित्रलेखा चेंबर्स मध्ये असलेल्या पेठे ज्वेलर्स या दुकानात 2017 ते 2024 या कालावधीत घडला.
याप्रकरणी देवेंद्र विनोदचंद्र शहा (वय 49, रा. पर्वती दर्शन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पराग चंद्रकांत पेठे आणि तनय पराग पेठे दोघेही (रा. सहवास सोसायटी, कर्वेनगर) या बाप-लेकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि पराग पेठे हे दोघेही परिचयाचे आहेत. पेठे ज्वेलर्स या दुकानात फिर्यादी यांना पराग व तनय या दोघांनी कमी भावामध्ये हिऱ्याचा नेकलेस आणि हिऱ्याच्या बांगड्या देतो असे आमिष दाखवले. तसेच पेठे ज्वेलर्स या फर्ममध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी आरटीजीएस द्वारे 35 लाख रुपये आणि रोख 25 लाख रुपये अशा 60 लाख रुपयांची गुंतवणूक केली.
पेठे आणि फिर्यादी यांच्यामध्ये स्टॅम्प पेपरवर या संदर्भात करार देखील झाला. या करारात ठरल्याप्रमाणे पेठे यांनी फिर्यादी शहा यांना हिऱ्याचा नेकलेस आणि हिऱ्याच्या बांगड्या अद्याप पर्यंत दिलेल्या नाहीत. फिर्यादी यांनी वेळोवेळी पराग यांच्याकडे त्या संदर्भात मागणी केली. त्यावेळी त्यांना वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ केली.
फिर्यादी यांनी पराग यांना भेटून नेकलेस आणि बांगड्या यांच्यासाठी घेतलेले 60 लाख रुपये परत देण्याची मागणी केली. त्यावेळी परागपेटी यांनी त्यांना दहा लाख रुपये परत दिले. मात्र शिल्लक रक्कम लवकरच देतो असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप पर्यंत त्यांनी उर्वरित 50 लाख रुपये परत न देता आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.