पुणे : पुण्यातील दक्षिण भागात पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा उपद्रव सुरू झाला आहे. या भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून, ४० हून अधिक टाके पडले आहेत. त्याच्यावर भारती विद्यापीठ रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चंद्रागण सोसायटी फेज ७ आंबेगाव पठार भारती विद्यापीठमागे घडली आहे. समर्थ सूर्यवंशी (वय ५ वर्षे) असं गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे.
समर्थ हा मुलगा पार्किंगमध्ये खेळत असताना दोन ते तीन भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, महापालिकेने या घटनेची दखल घेत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या घटनेची माहिती पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला कळविण्यात आली होती. त्यानुसार पुणे पालिकेकडे कार्यरत असलेल्या खासगी संस्थेची कुत्रे पकडण्याची गाडी पाठविण्यात आली.
त्या ठिकाणचे एकूण २४ कुत्रे पकडण्यात आले असून संस्थेच्या ताब्यात ठेवण्यात आले आहेत. मागील २० दिवसांमध्ये आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ, धनकवडी, कात्रज परिसरात एकूण २१८ कुत्रे नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यासाठी पकडण्यात आलेले असून त्यांची नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, प्रशासनाने या गंभीर घटनेची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.