बारामती : बारामतीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आमच्या कंपनीत गुंतवणूक केली तर महिना 5 ते 10 टक्के परतावा मिळेल असं सांगून गुंतवणूक करायला भाग पाडत पाच लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चौघांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मदन जहागीर पाडवी, वंदनादेवी मदन पाडवी (रा. अशोकनगर बारामती), सचिन डोंगरे व विकास निकम (पूर्ण नाव, पत्ते नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी विजय जयंत कुलकर्णी (रा. खंडोबानगर, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितनुसार, फिर्यादी कुलकर्णी व मदन पाडवी यांची बारामतीत एका टॅक्स कन्सल्टन्ट कार्यालयात भेट झाली होती. पाडवी यांनी माझी एसपीव्हीएस कंपनी असून ही कंपनी रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करते. कंपनीची मुंबई, दिल्ली येथे कार्यालये आहेत. त्यामध्ये वंदनादेवी पाडवी, डोंगरे, निकम यांच्यासह अन्य प्रतिष्ठित संचालक असल्याचे सांगितले. तुम्ही गुंतवणूक केली तर महिना पाच ते दहा टक्के परतावा मिळेल असे सांगण्यात आले.
त्यानुसार तीन प्लॅन कुलकर्णी यांना सांगण्यात आले. 1 ते 5 लाख रुपये गुंतवल्यानंतर त्यातून मिळणाऱ्या नफ्याची माहिती देण्यात आली. फिर्यादीकडे लागलीच रक्कम नसल्याने त्यांनी पैसे गुंतवले नाहीत. परंतु पाडवी यांनी पाठपुरावा
केल्यानंतर त्यांनी 15 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र बँकेतील ठेव मोडून ती या कंपनीत गुंतवण्यासाठी मदन पाडवी यांच्या खात्यावर रक्कम जमा केली. काही दिवसानंतर त्यांनी परताव्याची मागणी केली असता त्यांनी परतावा देण्यास टाळाटाळ केली. महिनाभरात पैसे मिळतील असे सांगत झुलवत ठेवण्यात आले. पुढे भेट घेतली असता कंपनीला तांत्रिक अडचण आली आहे, थोडे दिवस थांबा, असे सांगण्यात आले.
परंतु त्यानंतरही पैसे मिळाले नाहीत. पैशांची मागणी केली असता आमच्या कंपनीत अनेक राजकीय व्यक्ती, उद्योगपती आहेत. आमच्या नादाला लागला तर जीवाला मुकाल, कुटुंब उघड्यावर पडेल अशी धमकी देण्यात आली. या चौघांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पुढील तपास पोलिस करत आहेत.