राजुरी : जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रूक शिवारातील ठाकरवाडीमध्ये गांजा विक्रेत्याच्या घरात पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात ५ लाख ३६ हजार किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गांजा विक्रेत्यावर आळेफाटा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. सुरेश मनोहर केदारी (वय ३५, रा. बोरी बुद्रुक, ठाकरवाडी, ता. जुन्नर)असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. आरोपी केदारी यांना जुन्नर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत ठेवले असल्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी सांगितले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आळेफाटा पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांना १ एप्रिलला खबऱ्याकडून जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील ठाकरवाडीत सुरेश मनोहर केदारी यांच्या घरात गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक डॉ. पंकज देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला.
या छाप्यात १७ किलो ८६५ ग्रॅम वजनाचा अंदाजे ५ लाख ३५ हजार ९५० रुपये किंमतीचा गांजा जप्त केला. आळेफाटा पोलिसांनी संशयित आरोपीला अटक करून जुन्नर न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही कामगिरी पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एस. बी. होडगर, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर, सहा. फौजदार चंद्रा डुंबरे, पो. हवा. विनोद गायकवाड, पो.ना पंकज पारखे, पो. कॉ. अमित माळुंजे, पो. कॉ नविन अरगडे, पो. कॉ. हनुमंत ढोबळे यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडगुजर करत आहेत.