पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येत आहे. यात हवेली आणि मुळशी तालुक्यात तीन ठिकाणी एकाच वेळी अनधिकृत होर्डिंग पाडण्यात आले. त्यामुळे संबंधितांनी पुढील कारवाई टाळण्यासाठी पीएमआरडीएकडे तब्बल ४८ लाखांची रक्कम जमा केली आहे.
हवेली तालुक्यातील वडकी, मुळशी तालुक्यातील हिंजवडी येथून कारवाईस सुरूवात करण्यात आली. या कारवाईमुळे होर्डिंगधारक व अॅडव्हरटायझिंग कंपनी यांनी धसका घेतला आहे. पीएमआरडीएच्या विकास परवानगीकडे अंतिम चलने भरण्यास सुरुवात झाली आहे. २२ एप्रिलपर्यंत एकूण १० होर्डिंगधारकांनी अंतिम चलनांची रक्कम ४८ लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा केली आहे. संबंधित कारवाई पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त दिपक सिंगला, पोलिस अधिक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे, सहआयुक्त डॉ. दिप्ती सूर्यवंशी-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. कारवाईवेळी तहसीलदार रविंद्र रांजणे, तहसीलदार सचिन मस्के, अभियंता विष्णू आव्हाड, दिप्ती घुसे, प्रशांत चौगले, ऋतुराज सोनवणे, गणेश जाधव, तेजस मदने यांच्यासह स्थानिक बंदोबस्त तैनात होता.
पीएमआरडीए क्षेत्रात अवकाळी पाऊस, वादळी वारे आदींमुळे होर्डिंगपासून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याची दखल घेऊन यापुढे नियमित अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येणार आहे. वर्दळीच्या व रहदारीच्या ठिकाणाचे धोकादायक, मर्यादितपेक्षा उंचीचे, दुबार संरचना होर्डिंग काढून घ्यावेत. तसेच होर्डिंगधारकांनी अनधिकृत होर्डिंगला परवानगी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा एकतर्फी निष्कासन कारवाई करण्यात येणार आहे. तसेच पीएमआरडीएच्या परवानगीशिवाय कोणतेही नवीन आकाशचिन्ह उभारले जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन डॉ. दिप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी केले आहे.