पुणे : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 जागांवर उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 46 टक्के मतदान झाले. तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत बारामती विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 54.75 टक्के झाले.
अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच गर्दी होत होती. वृद्ध मतदारांसह नव मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. बारामती शहरासह मोठ्या लोकसंख्येच्या गावांमध्ये असणाऱ्या मतदान केंद्रामध्ये मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. बारामतीमध्ये महाराष्ट्रातीलच नाहीतर देशातील प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी या निवडणुकीतील प्रक्रियेबाबत वार्तांकन केले.
दरम्यान, उन्हाच्या झळांमुळे मतदान कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होत. मात्र, उन्हाची तीव्रता असताना देखील दुपारी तीननंतर मतदारांचा प्रतिसाद पाहायला मिळाला. निवडणूक विभागाकडून मतदान केंद्रांवर सावलीसाठी टाकण्यात आलेले मंडप, वैद्यकीय सुविधा आणि ओआरएस कीट या सुविधा देण्यात आल्याने मतदारांनी रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावला.