पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरातील किराणा माल व्यावसायिकाची स्वस्तात साखर देण्याच्या आमिषाने तब्बल ४५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगलीतील दोघांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
स्वाद फूडस प्रा. लि. चे संचालक विक्रम दिनकर पाटील (४१) आणि दिग्विजय दिनकर पाटील (३८, दोघे रा. अजिंक्यनगर, सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनील शिवारामजी गेहलोत (३८, रा. सखाई प्लाझा, भेलकेनगर, कोथरुड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना जून २०२३ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत घडली आहे.
याबबत अधिक माहिती अशी की, गेहलोत यांचे कोथरूडमधील भेलकेनगर परिसरात बालाजी ट्रेडिंग कंपनी किराणा माल विक्रीचे दुकान आहे. पाटील यांनी साखर कारखान्याकडून स्वस्तात साखर मिळवून देतो, असे आमिष गेहलोत यांना दाखवले होते. गेहोलत यांना १५० टन साखर देतो, असे सांगून त्यांच्याकडून ४५ लाख रुपये घेतले.
गेहलोत यांनी ऑनलाइन पद्धतीने पाटील यांच्या खात्यात वेळोवेळी ४५ लाख रुपये जमा केले. त्यानंतर पाटील यांनी त्यांना साखर दिली नाही. यावेळी त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गेहलोत यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र आळेकर करत आहेत.