भोर : भोरच्या ४४ हजार २७४ लाडक्या बहिणींचा तिसरा हप्ता बँक खात्यात वर्ग झाला असून उर्वरित ६ हजार ३० महिलांचे आधार सिडिंग नसल्याने त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याची माहिती भोरचे बालविकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांनी दिली.
तालुक्यात नारीशक्ती अॅप व पोर्टलवरून भरलेले ५० हजार ३०४ लाडक्या बहिणींचे अर्ज भरण्यात आले होते. दिवाळीपूर्वी खात्यात पैसे जमा झाल्याने लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील तालुक्यातील मंजूर अर्जापैकी ६ हजार ३० महिलांचे बँक खाते आधार सिडिंग केलेले नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ अद्याप मिळाला नाही. तरी सदर महिलांनी ५ ऑक्टोबरपर्यंत आधार सिडिंग करून घ्यावे. तसेच ज्यांचे आधार सिडिंग झाले आहे, परंतु लाभ मिळाला नाही त्यांनी टोल फ्री नंबर १८१ वर फोन करावा, अशी माहिती भोर येथील बालविकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांनी सांगितली आहे.