पुणे : कात्रज भागात अमली पदार्थ बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन किलो चरस, एक किलो गांजा असे ४३ लाख ८७ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. अरुण अशोक अरोरा (वय ५०, रा. प्रीतम हाईट्स, मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमली पदार्थ विरोधी पथक कात्रज भागात गस्त घालत होते. त्यावेळी अरुण अरोरा याच्याकडे मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती पोलीस कर्मचारी योगेश मांढरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. अरोरा याच्याकडून दोन किलो १४० ग्रॅम चरस, एक किलो ७९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत ४३ लाख ८७ हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अरोराने अमली पदार्थ कोणाकडून आणले, तसेच कोणाला विक्री करण्याच्या तयारीत होता? यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकातील सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, योगेश मांढरे, प्रशांत बोमादंडी, नितीन जगदाळे, आझाद पाटील, दिशा खेवलकर यांनी ही कारवाई केली.