पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर विधानसभा मतदारसंघातून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. त्यात 4 उमेदवार अपात्र ठरले आहेत.
उमेदवारांच्या त्यांच्या प्रस्ताविकांच्या उपस्थितीमध्ये विठ्ठलराव तुपे नाट्यगृह सभागृह निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय येथे नामनिर्देशन पत्रांच्या छाननीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी निवडणूक निरीक्षक भीम सिंह (आय.ए.एस) यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे, जिल्हा समन्वयक निवडणूक अधिकारी महेश सुधळकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नागनाथ भोसले, सहायक निवडणूक अधिकारी शैलजा पाटील आदी उपस्थित होते.
याबरोबरच सहायक निवडणूक अधिकारी अमोल पवार यांच्या निरीक्षणाखाली नामनिर्देशक पत्राची छाननी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यामध्ये 35 उमेदवारांचे 51 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 4 उमेदवार अपात्र ठरले आहेत. यामध्ये हरी दत्तात्रय सावंत, आरती साईनाथ बाबर, आनंद अण्णा आलकुंटे, अमृता प्रशांत जगताप या उमेदवारांचा समावेश आहे. तसेच यामध्ये एकूण प्राप्त नामनिर्देशन पत्र 51, वैध नामनिर्देशन 46, अवैध नामनिर्देशन 5, एकूण उमेदवारांची संख्या 35, वैधरित्या नामनिर्देशित उमेदवार 31, नामनिर्देशन फेटाळलेले उमेदवार 04 अशी आहेत.
याबरोबच वैध ठरलेली जी नामनिर्देशन पत्रे (दि.04 नोव्हेंबर) रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेता येतील. तसेच चिन्हाचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती निर्णय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे यांनी सांगितली आहे.