लोणी काळभोर: पुणे शहरालगत असलेल्या हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील गावे आजही विकासाच्या हिंदोळ्यावर लोंबकळत आहेत. १९८५ पासून पूर्व हवेलीतील ही गावे पुरंदर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली होती. २५ वर्षांनंतर २००९ मध्ये सदर गावे शिरूर – हवेली मतदारसंघाला जोडण्यात आली. चुरशीच्या निवडणुकीत हवेलीतील ही गावे आतापर्यंत निर्णायक ठरली आहेत. मात्र, या गावांतील सुविधा, प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. प्रत्येक निवडणुकीत आश्वासन देऊन मतदारांना झुलविले जात आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी वेगवेगळे राजकीय पक्ष व त्यांच्या नेत्यांबरोबर वाहत जाणेच हवेलीकरांच्या नशिबी आले आहे. मात्र, पायाभूत सुविधा, शाश्वत विकासाच्या नावाने बाराही महिने शिमगाच आहे.
हवेली तालुक्यातील लोणी काळभोर, वाघोली, उरूळी कांचन, कदमवाकवस्ती, सोरतापवाडी, थेऊर, कुंजीरवाडी, तरडे, आळंदी म्हातोबाची, खामगाव टेक, प्रयागधाम, कोरेगाव मूळ, भवरापूर, शिंदवणे, वळती, कोलवडी, केसनंद, लोणीकंद, अष्टापूर, पेरणे, डोंगरगाव, नायगाव, पेठ आदी ३८ गावे ही १९८५ मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पुरंदर विधानसभेला जोडण्यात आली. १९८५ मधील निवडणुकीत पुरंदर विधानसभा मतदारसंघात दादा जाधवराव यांनी १९२०४ मतांनी कॉंग्रेसच्या हरिश्चंद्र सस्ते यांचा पराभव केला होता. १९९० मध्ये दादा जाधवराव यांनी कॉंग्रेसचे विजय कोलते यांचा पराभव केला. १९९५ व १९९९ मध्येही जाधवराव यांनी विजय खेचून आणला. या चार निवडणुकीत जाधवराव यांचे मताधिक्य हळूहळू कमी होत गेले. २००४ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अशोक टेकवडे यांनी दादा जाधवराव यांचा पराभव करून विजयरथ रोखला. हवेली तालुक्यातील ३८ गावे या सर्व निवडणुकीत निर्णायक ठरत होती.
मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ च्या निवडणुकीत पुरंदरमधील समाविष्ट ३८ गावे ही शिरूर विधानसभा मतदारसंघाला जोडल्यामुळे पुरंदरकडे लंबक शिरूरकडे सरकला. गेली अनेक वर्ष हवेलीतील ३८ गावे विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. शहराला खेटून असलेल्या गावांत भौतिक सुविधा आल्या. त्यातच नागरिकीकरणाचा वेग वाढल्यामुळे या गावांची सूज वाढली. मात्र, पायाभूत सुविधांची वानवाच आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अनेक गावे विकासकामांपासून कोसो दूर आहेत. लोणी काळभोर, वाघोली, उरूळी कांचन, लोणीकंद ही गावे विजयी उमेदवाराच्या मताधिक्यांसाठी आतापर्यंत निर्णायक ठरली आहेत. तरीही ग्रामपंचायतींना निधी तोकडा पडत असल्यामुळे विकासकामांवर मर्यादा येत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधींकडून भरीव निधी मिळाला, तर या गावांचा प्रश्न सुटणार आहे. परंतु, अद्याप अनेक गावे विकासाच्या प्रतीक्षेत आहेत.
२००० नंतर हवेली तालुक्यातील या ३८ गावांमध्ये नागरीकरण वाढल्यामुळे आर्थिक सुबत्ता वाढली. त्यामुळे अनेक गावांमध्ये भौतिक सुविधा निर्माण झाल्या. त्याचबरोबर २००४ मध्ये पुुणे-सोलापूर आणि पुणे-अहिल्यानगर महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. त्यानंतर महामार्गावरील समस्या आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न आजतागायत कोणत्याही कारभाऱ्याला सोडवता आला नाही. स्थानिक नागरिक आणि चाकरमान्यांना दररोज मरणयातना सोसाव्या लागत आहे.
शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आणि राज्यकर्त्यांसाठी सोन्याची कोंबडी असलेल्या यशवंत साखर कारखान्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून लोंबकळत पडला आहे. पुरंदर तालुक्यातून बाहेर पडल्यानंतर ही गावे शिरूरला जोडली. त्यानंतर कारभारी बदलत गेले. परंतु, २०११ नंतर यशवंत कारखान्यासाठी विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जाहीरपणे आणाभाका घेतल्या, आश्वासने दिली. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना झुलवतच ठेवले आहे. त्यामुळे सोन्याची जमीन असलेला हा कारखाना कोणालाही चालविण्यात आणि सुरू करण्यात स्वारस्य नाही, हेच दिसून येत आहे.
ठळक मुद्दे-
लोणी स्टेशन, थेऊर फाटा, उरूळी कांचन, वाघोली, लोणीकंद येथे उड्डाणपुलांची गरज
पिण्याच्या पाण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज
जुन्या कालव्यातून पाणी उचलण्यासाठी परवानगी आवश्यक
ऊस उत्पादकांसाठी न्याय देण्याची अपेक्षा