पुणे : मागील महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. जुन्नर, खेड, हवेली, भोर आणि मुळशी अशा पाच तालुक्यांमधील ३७८ शेतकऱ्यांच्या २३१.३४ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह गारपिटीचा पाऊस झाल्याने आंबा, चारा पिके आणि तरकारी पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाने मदतीसाठी ४९ लाख ५० हजार रुपयांचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठविला आहे.
जिल्ह्यात गेल्या महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. काही गावांत वादळीवाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये पाच तालुक्यांतील ३७८ शेतकऱ्यांच्या २३१.३४ हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. विशेषतः या सर्व गावातील आंबा पिकाचे नुकसान झाले आहे. फळपिकांसाठी देण्यात येणाऱ्या निधीनुसार नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. नुकसानीचे पंचनामे करून मदतीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असून, मदत प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना मदत दिली जाईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले.