मावळ : ऐन विधासभा निवडणुकीत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मावळ विधानसभा मतदार संघातील अजित पवार गटाच्या माजी उपसरपंचाकडून ३६ लाखाची रोकड जप्त केली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी ही कारवाई रविवारी (दि. १०) माजी उपसरपंचाच्या कार्यालयावर छापा टाकून केली. या कारवाईत तब्बल ३६ लाख ९० हजार ५०० हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
सचिन शाबू मुर्हे (रा. सोमाटणे, चौराईनगर) असे रोकड जप्त केलेल्या माजी उपसरपंचाचे नाव आहे. तर सचिन मुऱ्हे यांची पत्नी धनश्री सचिन मुऱ्हे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत. तसेच आमदार सुनील शेळके यांच्या पत्नीने सुरू केलेल्या कुलस्वामिनी महिला बचत गटाच्या त्या सदस्या आहेत. सध्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी पथकांकडून तपासणी केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मुर्हे यांचा जमीन खरेदी-विक्री आणि स्टीलचा व्यवसाय आहे. त्यांच्या पत्नी तीन वर्षापूर्वी ग्रामपंचायत सदस्या होत्या. तळेगाव दाभाडे पोलिसांना सोमाटणे येथे मुर्हे यांच्या कार्यालयात मोठी रोकड असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे तळेगाव पोलीस आणि भरारी पथकामार्फत मुर्हे यांच्या कार्यालयावर छापा टाकला. या कारवाईत कार्यालयात ३६ लाख ९० हजार ५०० रूपयांची रोकड आढळून आली.
यावेळी सचिन मुऱ्हे यांना रकमेबाबत विचारणा केली असता त्यांना समाधानकारक उत्तर देता न आल्याने रोकड जप्त करण्यात आली आहे. याबाबत निवडणूक विभाग आणि आयकर विभागाला कळवून जप्त केलेली रक्कम आयकर विभागाकडे हस्तांतरित केली आहे, अशी माहिती उपयुक्त गायकवाड यांनी दिली आहे.