बीड : बीड येथील कुटे ग्रुपच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यातील फरार असलेल्या व्हाईस चेअरमन आणि डायरेक्टर पिता पुत्रांना खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. यशवंत वसंतराव कुलकर्णी (वय-55) आणि वैभव यशवंत कुलकर्णी (वय-24, दोघे रा. लेगसी मिल्लेन्निया सोसायटी, गायकवाडनगर, पुनवाळे, मुळ शिंदेनगर, बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या आरोपींविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी 42 गुन्हे दाखल आहेत अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटे ग्रुपच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीत 52 शाखांमधील साडेचार लाख ठेवीदारांची 3515 कोटींची फसवणूक केली होती. या घोटाळ्यानंतर व्हाईस चेअरमन आणि डायरेक्टर पिता पुत्र हे तीन महिन्यांपासून फरार होते. त्यांना अखेर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.
पुढील तपासासाठी दोन्ही पिता-पुत्रांना बीड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. यशवंत कुलकर्णी हे चेअरमन असून वैभव कुलकर्णी हे डायरेक्टर आहेत. या दोघांनाही वाकडच्या फिनोलेक्स मॉल या ठिकाणाहून पोलिसांनी सापळा रचून पकडले होते.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सुनिल भदाणे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अमर राऊत, पोलीस अंमलदार गणेश गिरीगोसावी, सुनिल कानगुडे, किरण काटकर, किशोर कांबळे, भुपेंद्र चौधरी, प्रदीप गायकवाड यांनी केली आहे.