पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (ST) आपल्या इलेक्ट्रिक बसेसच्या ताफ्यात वाढ करत आहे. ज्यामुळे चार्जिंग स्टेशनची स्थापना करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात राज्यातून येणा-या बसची संख्या लक्षात घेऊन स्वारगेट आगारात 15, तर दापोडी वर्कशॉपमध्ये 20 चॉर्जिंग पॉइंट बसविण्याची योजना आखण्यात आली आहे. ज्यामुळे ई-शिवनेरी आणि शिवाई सेवांना समर्थन देण्यासाठी दररोज 500 पर्यंत इलेक्ट्रिक बसेस चार्ज करणे शक्य होईल.
पुण्यात येणा-या गाड्यांची संख्या जास्त आहे. याचा विचार करुन एकाच ठिकाणी जास्तीत जास्त गाड्यांचे चार्जिंग व्हावे, या उद्देशाने चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवसभरात 500 बसच्या चार्जिंगची सुविधा होणार आहे. एसटीच्या इंधनावर होणारा खर्च वाढला आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला 215 ई-बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यामुळे पुणे विभागात चार्जिंग स्टेशनची संख्या वाढविण्यात येणार आहे.
इलेक्ट्रीक बस चार्ज करण्यासाठी डेपोमध्ये हाय-व्होल्टेज वीज जोडणी आवश्यक आहे. परिणामी, महामंडळ विभाग नियंत्रकांना या जोडण्यात लवकरात लवकर लावण्याचे आवाहन करत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळकडून सध्या डिझेलवरील लालपरीऐवजी भाडेतत्त्वावर इलेक्ट्रिक बस खरेदीला प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या हळूहळू वाढणार आहे.
दरम्यान, लालपरी या जिल्ह्याच्या ठिकाणातून कमी करुन तालुका पातळीवर त्याचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे महामार्गावरदेखील महामंडळाकडून चार्जिंग पॉइंट उभारण्यात येणार आहे.