पुणे : पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज माघारीची मुदत सोमवारी (ता. २९) संपली आहे. पुण्यातून ७, तर शिरूरमधून ३ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे पुण्यातून ३५ आणि शिरूरमधून ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. पुणे आणि शिरूर मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत गुरुवारी (ता. २५) संपली आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार नेमकी कुणाची मते खाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या कालावधीत पुण्यातून ४२ आणि शिरूरमधून ४६ उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी (ता. २६) दोन्ही मतदारसंघांतील अर्जांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये पुण्यातून एकही अर्ज बाद झाला नाही, तर शिरूरमधून अपक्ष ११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे पुण्यातून ४२ आणि शिरूरमधून ३५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. सोमवारी अर्ज माघारीची मुदत संपेपर्यंत पुण्यातून ७ उमेदवारांनी माघार घेतली.
त्यामध्ये पुण्यातून महायुतीचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पत्नी मोनिका मोहोळ यांनी पर्यायी (डमी) अर्ज सादर केला होता, मात्र, त्यांनी माघार घेतली. त्यांच्यासह एकूण सात जणांनी अर्ज माघार घेतले. शिरूरमधून ३ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे आता पुण्यातून ३५ आणि शिरूरमधून ३२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत, अशी माहिती पुण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुहास दिवसे आणि शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली आहे.