पुणे : ड्रग्स माफिया ललित पाटील याच्यासह १४ जणांविरुद्ध पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालायात आरोपपत्र दाखल केले आहे. पुणे पोलिसांनी दाखल केलेलं तब्बल 3150 पानांचे आरोपपत्र आहे. ड्रग्स रॅकेट प्रकरणी ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील आणि इतर साथीदारांच्या विरोधात हे आरोपपत्र पोलिसांनी न्यायलयात दाखल केले आहे. आरोपपत्रातून पोलिसांनी महत्वाचे पुरावे न्यायालयात सादर केले आहेत.
यामध्ये ड्रग्स प्रकरणातील मुख्य सूत्रधार ललित अनिल पाटील (वय ३७, रा. नाशिक), अरविंदकुमार प्रकाशचंद लोहरे (सध्या रा. मुंबई, मूळ रा. उत्तरप्रदेश), अमित जानकी सहा उर्फ सुभाष जानकी मंडल (वय २९, सध्या रा. पुणे), रौफ रहीम शेख (वय १९, रा. ताडीवाला रस्ता, पुणे रेल्वे स्थानक परिसर), भूषण अनिल पाटील (वय ३४), अभिषेक विलास बलकवडे (वय ३६), प्रज्ञा अरुण कांबळे उर्फ प्रज्ञा रोहित मोहिरे (वय ३९), जिशान इक्बाल शेख, शिवाजी अंबादास शिंदे (वय ४०, सर्व रा. नाशिक), रेहान उर्फ गोल आलम सुलतान मोहम्मद अन्सारी (वय २६, सध्या रा. मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश), राहुल पंडीत उर्फ रोहित कुमार चौधरी उर्फ अमित कुमार (वय ३०, सध्या रा. विरार, मूळ रा. बिहार), समाधान बाबुराव कांबळे (वय ३२, रा. मंठा, जि. जालना), इम्रान शेख उर्फ अमिर आतिक खान (वय ३०, रा. धारावी. मुंबई), हरिश्चंद्र उरवादत्त पंत (वय २९, रा. वसई, पालघर) अशी आरोपपत्र दाखल केलेल्यांची नावे आहेत.
पुण्यातील चाकण परिसरात मेफेड्रोन विक्री प्रकरणात ललित पाटीलला अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. आजारी असल्याचे नाटक करून पाटील हा ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. रुग्णालयात असताना त्याने साथीदारांच्या मदतीने मेफेड्रोन विक्री सुरू केली होती. त्यावेळी ससून रुग्णालयातील गेटवर 2 कोटी 14 लाखांचे ड्रग्स आढळले होते. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने ससून रूग्णालयाच्या आवारात सापळा लावून ललितच्या साथीदारांना अटक केली होती. त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते.
या रॅकटेचा तपास करत असताना बड्या लोकांचा हात असल्याचे उघड झाले. ससून रुग्णालयातील कर्मचारी, पोलीस, कारागृह पोलीस, कारागृहातील डॉक्टरांसह ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा संबंध असल्याचं समोर आले होते. या प्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते आणि सहा जणांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती.