पुणे : मागील काही दिवसांपासून कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातवरण दिसत आहे. मात्र, याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कांदा चोरीवर आपले लक्ष केंद्रीत केले असून आंबेगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याचा 35 ते 40 गोणी कांदा चोरून नेल्याची घटना घडली आहे. कांद्याकडे चोरट्यांनी मोर्चा वळविल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रूक येथील शेतकरी अरुण निवृत्ती थोरात यांनी आपल्या मालकीच्या वेताळमळा परिसरात हवेशीर ठिकाणी आधुनिक पद्धतीने कांदा चाळ उभारून चाळीत एकूण 400 पिशवी कांदा साठवून ठेवला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी 300 पिशवी कांद्याची विक्री केली होती.
दिवाळी सणासाठी पैसे उपलब्ध व्हावेत म्हणून 100 कांदा पिशवी चाळीत साठवून ठेवला होता. मंगळवारी (29 ऑक्टोबर) सकाळी निवृत्ती पाटीलबुवा थोरात हे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता त्यावेळी त्यांना कांदा चाळीच्या जमिनीच्या बाजूकडील बांबू काढून कांदे चाळीतून बाहेर काढल्याचे दिसून आले. त्यांनी मुलगा अरुण थोरात यांना विचारणा केली. त्यावेळी चाळीतील कांदे चोरीला गेल्याचे लक्षात आले.
सुमारे दोन टन कांद्यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला ऐन दिवाळीत 70 ते 80 हजार रुपयांचा फटका बसला आहे. परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केल्यानंतर सोमवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरटे छोटा हत्ती गाडीतून कांदे चोरुन नेल्याचे दिसत आहे. याप्रकरणी शेतकरी अरुण थोरात यांनी मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.