पुणे : बापू नायर टोळीतील गुंड तरबेज सुतार याने थेट कारागृहातून खंडणी उकळण्याचा प्रकार सुरू ठेवल्याचे समोर आले आहे. यासाठी सुतारने कारागृहात १४ वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांचा वापर केला आहे. त्याने जीवे मारण्याची धमकी देत एका तरुणाकडे 30 लाखांची खंडणीची मागणी केली. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने बापू नायर टोळीतील दोघांना ताब्यात घेत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै 2021 ते 16 मे 2024 या कालावधीत वरखडे नगर, कात्रज येथे घडला आहे.
तबरेज मेहबुब सुतार (रा. कात्रज), अविनाश नामदेव मोरे (रा. सहकारनगर, पुणे), सागर किसन धुमाळ (रा. अपर डेपो, पुणे), कुमार उर्फ पप्पु सायकर (रा. सासवड, पुणे) यांच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कात्रज येथील 34 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे इलेक्ट्रीक व्यवसायिक असून त्यांचा प्लॉट खरेदी-विक्रीचा देखील व्यवसाय आहे. मुख्य आरोपी तबरेज सुतार हा बापू नायर टोळीतील सदस्य आहे. फिर्यादी यांना आरोपी सुतार हा बेकायदेशीर पैशाच्या मागणीसाठी धमकावत असल्याची तक्रार खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे तपास केला असता सुतार याच्या साथीदारांनी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन अविनाश मोरे आणि सागर धुमाळ यांना ताब्यात घेतले असून ते सध्या पोलीस कस्टडी मध्ये आहेत. तर तबरेज सुतार हा बापु नायर टोळीतील सक्रीय सदस्य असून तो मार्च 2023 पासून जेलमध्ये आहे. तबरेज याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न असे ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.