-राहुलकुमार अवचट
यवत : वरवंड येथील 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाची इमारत व अधिकारी निवासस्थाने बांधकाम करण्यासाठी सुमारे 30 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दिली.
यावेळी आमदार कुल म्हणाले की, विधानसभा सभागृहात वरवंड येथील ग्रामीण रुग्णालय स्थापन करण्याबाबत अधिवेशनात चर्चा करण्यात आली. सदर चर्चेवेळी उत्तर देताना तत्कालीन आरोग्य राज्यमंत्र्यांनी ग्रामीण रुग्णालय स्थापनेस मान्यता देण्याचे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दौंड तालुक्यातील वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे 30 खाटांच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली.
यासाठी सुसज्ज इमारत व अधिकारी, कर्मचारी यांच्या निवासस्थान बांधकामांसाठी निधीसाठी मान्यता मिळाली आहे. मुख्य इमारतीसाठी सुमारे 25 कोटी रुपये व अधिकारी निवासस्थानासाठी 5 कोटी असा एकूण 30 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
वरवंड येथील ग्रामीण रुग्णालय झाल्याने परिसरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.