पुणे : पुणे शहर पोलीस दलातील तीन कर्मचार्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. नाशिक-मुंबई महामार्गावरील दिवे गावात कार अडवून पोलीस असल्याचे सांगून गाडीतील हवालाचे ४५ लाख रुपये लुटल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांनी ही कारवाई केली आहे. या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस शिपाई गणेश मारुती कांबळे, गणेश बाळासाहेब शिंदे, दिलीप मारुती पिलाणे अशी बडतर्फ केलेल्या पोलिसांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हे तीन जण दत्तवाडी पोलीस ठाण्यात नेमणूकीला असताना ८ मार्च २०२२ रोजी सकाळी भिवंडीजवळील दिवे गावात हा प्रकार घडला होता. तिघांविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात येऊन विभागीय चौकशी केली जात होती. त्यात दोषी ठरल्याने त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
नेमक काय घडल?
तिघे जण एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याने त्यांचे घरगुती संबध होते. दिलीप पिलाणे यांच्या बहिणीचा धार्मिक कार्यक्रम असल्याने ते तिघे आणि बाबूभाई सोळंकी हे पुण्याहून दिवे येथे गेले होते. बाबुभाई सोळंकी याला त्याच्या भावाचा फोन आला होता. त्यावेळी गणेश कांबळे याला बाबुभाई सोळंकी याच्याकडून हवालाचे पैसे औरंगाबादमधून नाशिक मार्गे ठाणे येथे जाणार असल्याची माहिती मिळाली. यावेळी तिघांनी संगनमत करून भिवंडीजवळील दिवे गावात रामलाल परमार यांची हवालाचे पैसे घेऊन जाणारी गाडी अडविली. त्यांना पोलिस असल्याचा धाक दाखवून वाहनाची तपासणी करुन कारवाई करण्याची भिती दाखविली. तसेच गाडीतील ४५ लाख रुपये घेऊन त्यांना तेथून हाकलून दिले होते.
अटक चुकविण्यासाठी आजारी असल्याच ढोंग
याप्रकरणी त्यांच्यावर जबरी चोरीचा गुन्हा दाखल असताना देखील अटक चुकविण्यासाठी गणेश कांबळे याने आजारी नसताना पोलीस निरीक्षकांची दिशाभूल करुन सीक पास मिळविला होता. तसेच गणेश शिंदे याने प्रशिक्षण काळात साप्ताहिक सुट्टी मिळाली नाही म्हणून साप्ताहिक सुट्टी घेतो, तसेच दिलीप पिलाणे यानेही पर्यायी साप्ताहिक सुट्टी घेऊन भिवंडीला जाऊन गुन्हा केल्याचे विभागीय चौकशीत सिद्ध झालं आहे. त्यामुळे समाजात पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याने त्यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे.