पुणे : पुण्यात २२ जानेवारीला आगीच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या या घटनांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाच्या जवानांची चांगलीच धावपळ झाली. सुदैवाने तिन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, यामध्ये मोठं नुकसान झालं आहे.
१ . कुमठेकर रस्ता परिसरात आगीची घटना
पुणे शहरातील कुमठेकर रस्ता परिसरात असलेल्या एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील प्लॅटला सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. आग लागल्याचं कळताच इमारतीतील रहिवाशांनी बाहेर पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरातील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
२ . कसबा पेठ परिसरात आगीची घटना
कसबा पेठ परिसरात आगीची दुसरी घटना घडली आहे. येथील तांबट हौद वाड्यातील एका घराला सोमवारी दुपारी भीषण आग लागली. अग्निमन दलानच्या जवानांनी आग विझवत परिस्थिती नियंत्रणात आणली. ही आग शॉर्टसक्रिटमुळे लागल्याचं सांगितलं जातं आहे.
३ . कॅन्टोमेंट परिसरात आगीची घटना
पुणे शहरातील कॅन्टोमेंट परिसरात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आगीची तिसरी घटना घडली. शिवाजी मार्केट नजीक मॉर्डन डेअरीमध्ये फटाक्यामुळे आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाकडून चार फायरगाड्या आणि दोन वॉटर टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने आगीत कुठलीही जीवितहानी नाही मात्र, मोठं नुकसान झाले.