पुणे : विनाकारण शिवीगाळ व मारहाण करून, नाकाचे हाड फ्रॅक्चर केले. तसेच जबरी चोरी करून पळून गेलेल्या तीन आरोपींना कोंढवा पोलिसांनी २४ तासांत अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. ही घटना २१ नोव्हेंबर रोजी रात्री अकराच्या सुमारास शिवतीर्थ अपार्टमेंटसमोर, शिवनेरीनगर येथे घडली होती.
याप्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेऊन सुरज मुकुंद उगले (वय- २०, रा. शिवनेरी नगर, कोंढवा, पुणे) याला अटक केली आहे. याबाबत मयुर शिवाजी कोऱ्हाळे (वय-२३, रा. शिवनेरी नगर, कोंढवा बुद्रुक) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुर कोऱ्हाळे हे त्यांच्या मामेभावासोबत दुकानात जात होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीच्या आरोपींनी विनाकारण शिवीगाळ केली. याचा जाब विचारला असता आरोपींनी मयुर कोऱ्हाळे याच्या नाकावर ठोसा मारुन नाकाचे हाड फ्रॅक्चर केले. तसेच फिर्यादीकडील १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळून गेला. एवढ्यावरच न थांबता, इतर आरोपींनी त्याच्या पाठीचा चावा घेऊन काठीने बेदम मारहाण केली. फिर्यादीच्या मामेभावाला देखील मारहाण केली होती.
याप्रकरणी कोंढवा पोलीस गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांनी तपास पथकाला तसे आदेश दिले होते. तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेशकुमार पाटील व त्यांचे पथक आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, पोलीस हवालदार सतीश चव्हाण व विशाल मेमाणे यांना आरोपी कान्हा हॉटेल चौकात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले.