पुणे : रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे पुणे-मुंबई दरम्यानच्या 29 गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरील फलाट क्रमांक 10 आणि 11 च्या विस्तारीकरणाच्या कामामुळे (दि.01) आणि (दि.02) जूनला डेक्कन क्वीन, प्रगती, इंद्रायणीसह इतर महत्त्वाच्या पुणे-मुंबई दरम्यान धावणा-या 29 गाड्या रद्द करण्यात येणार आहे. 15 गाड्या दादर आणि 10 गाड्या पुणे स्थानकातून माघारी जाणार आहेत, यामुळे रेल्वेने मुंबईला जाणा-या प्रवाशांचे हाल होणार आहेत.
तसेच या दोन दिवसात भुवनेश्वर, चेन्नई, बिदर, लातूर एक्सप्रेससह इतर 15 गाड्या दादर स्थानकापर्यंत धावतील. तसेच परतीचा प्रवास दादर येथूनच करावा लागणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार असल्याचे दिसून येत आहे.
तसेच उद्यान, कोयना, नागरकोईल होसपेट आणि सिध्देश्वर एक्सप्रेस या गाड्या पुणे स्थानकावरच थांबणार आहेत. त्यामुळे या दोन दिवसांत या गाड्या पुण्यातून त्यांच्या निर्धारित वेळेत माघारी जाणार आहेत. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणा-या प्रवाशांचे हाल होणार असल्याचे दिसून येत आहे.