संगीता कांबळे
पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात आज अखेर (दि.२४) डेंग्युचे २९ संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये १५ पुरुष व १४ महिला रुग्णांचा समावेश आहे.
डेंग्युच्या निदानासाठी एकुण ३६३५ संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यात २९ संशयीत रुग्ण आढळुन आलेले असून या रुग्णांपैकी १५ पुरुष व १४ महिला रुग्णांचा समावेश आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात हिवताप, डेंग्यु व चिकनगुनिया या आजारांच्या साथीचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पावसाळ्यात काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी महानगरपालिकेने डेंग्यू मुक्त पीसीएमसी मोहिमेची सुरुवात केलेली आहे.
या मोहिमेअंतर्गत सोमवार ते शनिवार डास नियंत्रणाबाबत महानगरपालिकेच्या वैद्यकिय व इतर विभागामार्फत विविध प्रकारच्या कार्यवाही केल्या जात आहेत. तसेच दर रविवारी नागरिकांनी “प्रत्येक आठवडा एक दिवस एक तास” या मोहिमेअंतर्गत सकाळी ९ ते १० ही वेळ स्वत:करीता देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज बुधवारी (दि. २४) पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत पिंपरी चिंचवड शहरातील सरकारी व खासगी शाळांमध्ये किटकजन्य आजार आणि डेंग्यूबाबत जनजागृतीपर व्याख्याने करुन व्हिडिओद्वारे माहिती देण्यात आली.
तसेच गुरुवारी (दि.२५ ) पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत पिंपरी चिंचवड शहरात सोशल मीडियामार्फत व कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या एलईडी स्क्रिनवर डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करणारे व्हिडीओ/ ऑडीओ लावून मोहिम राबविण्यात येणार आहे. डेंग्यू आजाराबाबत प्रभावशाली अथवा प्रसिध्द व्यक्तींचे व्हिडिओ तयार करुन त्याव्दारे तसेच चर्चासत्र व परिसंवादांचे आयोजन करुन नागरीकांमध्ये जनजागृती
करण्यात येणार आहेत.