पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी कोथरूड परिसरातील एकाची २९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ५३ वर्षीय व्यक्तीने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने फिर्यादींच्या मोबाईलवर संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्याने त्यांना दाखविले. फिर्यादींना व्हॉटस्अॅपमधील एका ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. परताव्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. फिर्यादीने चोरट्याच्या बँक खात्यात २९ लाख ४० हजार रुपये जमा केले. चोरट्याने त्याचा मोबाईल क्रमांक बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत.
नोकरीचे प्रलोभन दाखवत पावणेतीन लाखांना गंडा
केशवनगर मुंढवा येथील एका व्यक्तीला नोकरीचे प्रलोभन दाखवत चोरट्यांनी दोन लाख ८७ हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला. याप्रकरणी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ४३ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.